नागरिक आणि प्रशासन यांच्यात जाहीर वाद-संवाद सफल



पुण्याच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०११-१२ या विषयावर शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०१२ रोजी नागरिकांच्या वतीने पुण्याच्या प्रशासनाबरोबर जाहीर वाद संवाद आयोजित करण्यात आला. नागरिकांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चाने पहिल्यांदाच घेण्यात आलेला हा जाहीर संवाद ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या प्रबोध सभागृहात संपन्न झाला. प्रशासनातर्फे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. नरेश झुरमुरे, उपायुक्त (तांत्रिक) श्री. सुनील केसरी, आणि पर्यावरण अधिकारी श्री. मंगेश दिघे आपल्या पर्यावरणावर काम करणाऱ्या गटासह उपस्थित होते. पर्यावरण अहवालाची गरज व तयार करण्याची प्रक्रिया, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, त्यांचे मूल्यांकन व पर्यावरण कार्यप्रवणता निर्देशांक या मुद्द्यांवर अत्यंत सुसंगत चर्चा झाली. इतकच नाही तर श्री. नरेश झुरमुरे यांनी सकारात्मक पद्धतीने नागरिकांचे मुद्दे स्वीकारले, लिहून घेतले, आणि पुढील अहवालात यांना समाविष्ट करण्याची ग्वाही देखील दिली. प्रशासनाने नागरिकांच्या प्रयत्नांना सबळ पाठींबा दिला. पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात कोणत्या प्रकारे सुधारणा करता येतील याच एकमेव दिशेने वाद संवाद पार पडला आणि सफल झाला.

अतिरिक्त आयुक्त श्री. नरेश झुरमुरे यांनी नागरिकांना दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पर्यावरण अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहन केले, हे या वाद-संवादाचे फलित आहे. नागरिकांचा प्रशासनाशी संवाद घेण्याचा उद्देश बिनदिक्कत सफल झाला, यासाठी नागरिकांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो.

परंतु काही वृत्तपत्रांनी य चर्चेचे वृत्तांकन अयोग्य पद्धतीने केलेले आज (दिनांक १६ डिसेंबर २०१२) दिसून आले. या यथार्थ संवादाचा मूळ हेतू व त्याचा निष्कर्ष य वृत्तांतून निसटला आहे. दोघांच्याही समन्वयाने नागरिक आणि प्रशासन यांच्यात दुरगामी संवाद प्रस्थापित होणे हे सबळ लोकशाहीचे लक्षण आहे. काही वृत्तपत्रांतील बातम्या अपुऱ्या व अर्धवट माहितीच्या आधारे या घटनेचा विपर्यास करीत आहेत, हे सांगण्यास मात्र खेद वाटतो.


नागरिकांच्या वतीने,
अभिषेक वाघमारे
+९१ ९५५२००३९१८
punepublicdebate@gmail.com



वाद संवादाचा झालेला खर्च बघण्यासाठी येथे क्लिक करा